विशेष प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास ओबीसी फेडरेशनचा विरोध

0
735

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण  देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला  एसईबीसी या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच याबाबत न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी  आज (सोमवार) येथे सांगितले. यामुळे मराठा आरक्षण  वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

ओबीसी फेडरेशनची आज मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात बैठक झाली. यावेळी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे,  प्राध्यापक श्रावण देवरे, धोबी समाजाचे नेते बालाजी शिंदे, आमदार हरिभाऊ राठोड आणि विद्रोही कवी सचिन माळी आदी उपस्थित होते.

यावेळी अहवाल देणारा मागासवर्ग आयोग घटनाबाह्य पद्धतीने गठित केल्याचा आरोपही या नेत्यांनी केला आहे. तसेच सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न असल्याचा दावा ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी केला आहे. मराठा आरक्षणासंबंधी सर्व आक्षेप नोंदवून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले. तर मराठा समाजाला आरक्षण देण्याआधी लोकसंख्येच्या आधारावर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.