विवाह समारंभामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव, एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल

0
416

पनवेल, दि. २७ (पीसीबी) – कोरोनाच्या संसर्गामुळे वधू-वरांकडील ठराविक ५० व्यक्तींमध्ये विवाहसोहळे आटपून घ्या, असे वारंवार आवाहन करुनही विवाह आणि हळदी समारंभात गर्दीत करुन तो दणक्यात साजरा केल्याचा मोठा फटका पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या हळदी, विवाह सोहळ्यातील गर्दीमुळे ३६ वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुण हा संबंधित नवरदेवाचा भाऊ होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हे दाखल केले असून हळदी आणि विवाह समारंभात सामिल झालेल्या ९० जणांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी पोलीसांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

पनवेल तालुक्यात टाळेबंदी उघडल्यानंतर मे व जून महिन्यात मोठ्या गर्दीत हळदी समारंभ पार पडले. नेरे गावात अशाच पद्धतीने १४ व १५ जूनला झालेल्या हळदी व विवाहसोहळा ग्रामस्थांच्या अंगलट आला आहे. या गावातील आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शेकापच्या एका तरुण पदाधिकाऱ्याचा कोरोनामुळं झालेल्या मृत्यूनंतर या गर्दीच्या घटनेला वाचा फुटली. चार दिवसांपूर्वी त्यांचा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाच्या संपर्कात सर्व वऱ्हाडी मंडळी आली होती.