Chinchwad

विवाहितेच्या छळ प्रकरणी पोलीस शिपायासह चौघांवर गुन्हा

By PCB Author

October 06, 2020

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलीस शिपायासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून 5 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडला आहे. पोलीस शिपाई नितीन विठ्ठल राठोड, सासू शांताबाई विठ्ठल राठोड, सासरा विठ्ठल फुलाजी राठोड (तिघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), नणंद नीलम श्रीकांत चव्हाण (रा. कर्जत, रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन राठोड हे पिंपरी-चिंचवड शार्हात पोलीस शिपाई म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांनी पिडीत विवाहितेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. सासूने माहेरच्यांकडून फ्लॅट घेण्यासाठी पैसे घेऊन येण्याची मागणी केली. सास-याने दारू पिऊन येऊन विवाहितेला शिवीगाळ केली. नणंदेने विवाहितेला घरातून हाकलून देण्यासाठी पती आणि सासूला भडकावले.

याबाबत पिडीत विवाहितेच्या आई, वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी दोन वेळा वाल्हेकरवाडी येथे बैठक घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन राठोड याने सासरच्या लोकांना उलटसुलट बोलून हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.