विलास लांडेंनी शिरूरमधून दुसऱ्यांदा लढावे यासाठी पक्षश्रेष्ठींचा आग्रह; लांडेंनी वळसे-पाटलांचे नाव केले पुढे

0
12036

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेची जोरदार तयारी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत मात्र गोंधळाचे वातावरण आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवार कोण?, याबाबत संभ्रमाची अवस्था आहे. मावळ मतदारसंघात ऐनवेळी बाहेरचाच तगडा उमेदवार देण्याची शक्यता अधिक आहे. शिरूर मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्याचे समजते. परंतु, लांडे यांनी या मतदारसंघात एकदा पराभवाची चव चाखली आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार बळीचा बकरा ठरतो. याचा त्यांना अनुभव आला आहे. त्यामुळे लांडे यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचे नाव पुढे केल्याचे समजते. शिरूरमधून वळसे-पाटील यांनाच मैदानात उतरवण्याचा मागणी लांडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघात लांडे की वळसे-पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

लोकसभा निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी आहेत. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मावळ मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूर मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांनीही आपापल्या मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिरूर मतदारसंघात येणाऱ्या राजगुरूनगरमध्ये नुकतीच जाहीर सभा झाली. त्यामुळे शिरूर मतदारसंघात शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार असलेल्या या दोन्ही मतदारसंघात मित्रपक्ष भाजपनेही निवडणूक तयारीला वेग दिला आहे. युती न झाल्यास हे दोन्ही मतदारसंघ लढवण्याच्या इराद्याने भाजप कामाला लागले आहे.

शिरूर आणि मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ३ नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून भाजपही आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार हे निश्चित आहे. भाजप आणि शिवसेनेची अशा प्रकारे आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत मात्र गोंधळाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. आघाडीच्या जागा वाटपात मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी ऐनवेळी बाहेरचा तगडा उमेदवार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र शिरूरमध्ये उमेदवार निश्चित करताना राष्ट्रवादीची दमछाक होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे राहावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्याचे समजते. निवडणुकीतील उमेदवार निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करतात, हे उघड गुपित आहे. लोकसभा निवडणूक म्हटले की एका उमेदवाराला किमान ३० ते ५० कोटी रुपये खर्च करावे लागतात. एवढा मोठा खर्च करण्याची लांडे यांची आर्थिक ताकद आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी लांडे यांना शिरूरमधून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातल्याचे बोलले जाते.

मात्र लांडे यांनी पक्षश्रेष्ठींच्या आग्रहापुढे सावध भूमिका घेतल्याचे समजते. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणजे राजकीय बळीचा बकरा ठरतो, याचा त्यांना पुर्वानुभव आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचा एक गट स्वपक्षाच्याच उमेदवाराला बळीचा बकरा बनवण्यात माहीर आहे. त्यामुळे पक्षातीलच गटाने पुन्हा बळीचा बकरा केल्यास निवडणुकीत केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. त्यामुळे लांडे यांनी आपल्याऐवजी विधानसभेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांना शिरूरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते. वळसे-पाटील मैदानात असल्यास सर्व गट एक होतील आणि पक्षाचे काम करतील, असा लांडे यांना विश्वास आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी म्हणजे शरद पवार हे शिरूर मतदारसंघात विलास लांडे की दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.