विलास लांडेंनी विधान परिषदेवर आमदार होण्याची राजकीय पात्रता गमावली; राजकीय अस्तित्व धोक्यात

0
4099

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडला विधान परिषदेत स्थान मिळणार आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत आमदारकी दिली जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीने लांडे यांना डावलून पक्षाचे निष्ठावान बाबाजानी दुर्राणी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे लांडे हे विधान परिषदेवर पाठविण्याच्या राजकीय पात्रतेत बसत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही लांडे यांना विजय मिळेल, असे सध्याचे राजकीय चित्र नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले असून, अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी ते कोणता राजकीय पर्याय निवडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. या ११ पैकी एक आमदार राष्ट्रवादीचा निवडून येणार आहे. या एका जागेवर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, राष्ट्रवादीने परभणीतील पक्षाचे निष्ठावान बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारी देऊन लांडे यांच्यासाठी विधान परिषदेच्या आमदारकीचे दार बंद केले आहेत. त्यामुळे लांडे आमदार होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यामुळे लांडे हे विधान परिषदेत आमदार होण्याच्या राजकीय पात्रतेचे नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीत भोसरी मतदारसंघात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून आपली राजकीय पात्रता उंचावण्याची लांडे यांच्यासाठी संधी होती. परंतु, त्यांनी महापालिका निवडणुकीत संधी असूनही आपली राजकीय पात्रता गमावली. केवळ आपल्या कुटुंबातील सदस्याला निवडून आणण्याची राजकीय क्षमता त्यांनी सिद्ध केली. त्यामुळेच लांडे यांचे पुढचे राजकीय गणित फिसकटले आहे. आता ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील, अशी राजकीय स्थिती नाही. ते राष्ट्रवादीकडून आमदारकी लढल्यास पराभव होईल, असे या मतदारसंघातील चित्र आहे. त्यातच ते शहराच्या राजकारणात अडगळीत पडले आहेत. त्यामुळे लांडे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचे मानले जात आहे.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. विलास लांडे हे माजी आमदार आहेत. सलग दहा वर्षे ते आमदार होते. त्यांच्या घरात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी महापालिकेतील महत्त्वाची पदे होती. त्यामुळे महापालिकेच्या खालच्या मजल्यापासून ते चौथ्या मजल्यावरील कोणत्या विभागात काय काय चालते?, याची खडानखडा लांडेंना माहिती आहे. तरीही गेल्या दीड वर्षात लांडे यांनी महापालिकेच्या कारभाराबाबत चकार शब्दही काढलेला नाही. याचाच अर्थ महापालिकेत रामराज्य सुरू असल्याचे स्पष्ट होते. तसेच लांडे यांच्या या चुप्पीचा दुसरा राजकीय अर्थही काढला जात आहे. भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय होणे अवघड असल्यामुळे विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर किंवा उमेदवारी वाटपच्या शेवटच्या क्षणी ते अन्य राजकीय पक्षांसोबत घरोबा करतील, असे बोलले जात आहे.

लांडे यांच्या चुप्पीमागे दोन दगडावर पाय ठेवण्याचे राजकारण असल्याचे म्हटले जाते. आगामी विधानसभेसाठी भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. विशेषतः भोसरी मतदारसंघात शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. अशा परिस्थितीत लांडे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी शिवसेना हा आशेचा किरण ठरू शकते. राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर लांडे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या बातम्या पेरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे लांडे आगामी काळात वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय अस्तित्व धोक्यात आले असताना ते जिवंत ठेवण्यासाठी लांडे कोणता निर्णय घेणार याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.