विलास मडिगेरी मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा

0
411

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


या प्रकरणी मडिगेरी यांनी तक्रार दिली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर महापौर दालनासमोर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच स्थायी समिती अध्यक्षांचा अँन्टी चेंबर आहे. तिथे सोमवारी सांयकाळी सव्वा सहा वाजता हा प्रकार घडला.
‘तुम्ही अध्यक्ष असताना भरपूर पैसे कमावले आहेत, त्यामुळे त्यातील काही वाटा आम्हाला द्यावा’, असे म्हणत कलाटे बंधूंनी वाद घातला. त्यानंतर आरडाओरड करुन मारहाण केली. आवाज एकून महापौर, इतर पदाधिकारी व नगरसेवक यांनी मध्यस्थी करुन मला सोडवले, असे मडीगेरी यांनी तक्रारीत म्हटले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले.


दरम्यान, या प्रकरणी महापैर माई ढोरे, उपमहापैर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी मिळून पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना एक निवेदन दिले होते. गुंड नगरसेवकांवर कठोर कारवाईची मागणी निवेदनात केली होती. भूसंपादन करताना खासगी वाटाघाटीने जमीन संपादना एवजी टीडीआर मोबदला देऊन ताबे घेण्याचा विषय होता. त्याशिवाय महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी योजने एवजी विमा योजना लागू करण्याचा विषयावर मतभेद होते. त्या मुद्यांवर मडिगेरी यांची भूमिका अडेलतट्टूपणाची होती, असे मारहाण करणारे मयूर कलाटे यांनी सांगितले होते. सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी त्या संदर्भात भाजपाची भूमिका स्पष्ट केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक काही एजंटांच्या माध्यमातून भूसंपादनाच्या प्रकरणात महापालिकेची लूट करतात असा आरोपही ढाके यांनी केला आहे. कलाटे बंधू यांच्या संपादनातील जमिनींचे ताबे ते देत नाहीत, असेही ढाके यांनी उघडकिस आणले. मारहाणीचा प्रकार ज्या दोन कारणांवरून झाला होता त्याबाबत तक्रारीत काहीच उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.