विलास मडिगेरी मारहाण प्रकरणी वादळ शमले कसे ? – सर्वसाधारण सभेत भाजपानेही तलवार म्यान केली, औपचारीकता म्हणून फक्त निषेध ठराव

0
383

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे या दोघा बंधुंनी महापालिका भवनात स्थायी समितीच्या अँन्टी चेंबरमध्ये सोमवारी (दि.१) बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी गुंड नगरसेवकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महापैर माई ढोरे, उपमहापैर तुषार हिंगे, सत्ताधारी नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. प्रकरण गंभीर असल्याने गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल अशा घडामोडी सुरू होत्या.

महापालिका सभेत या विषयावर जोरदार निषेध करायचा, शिवसेना, राष्ट्रवादीवर तुटून पडायचे भाजपाने ठरविले होते. प्रत्यक्षात केशव घोळवे यांनी दोन मिनीटांत निषेध केला, माऊली थोरात यांनी त्याला अनुमोदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर त्यावर दोन शब्द बोलले आणि त्यानंतर हा विषय वाढवू नका, असे म्हणत दोन्ही बाजुंनी तलवारी म्यान करण्यात आल्या. भाजपाच्या जेष्ठ नगरसेवकाला इतकी बेदम मारहाण होऊनही त्याबाबत सभागृहात केवळ एक औपचारिकता म्हणून निषेध झाला, पण पुढील कटुता टाळण्यात आली. भाजपाच्या नगरसेवकांनीही त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

भाजपाने राहुल व मयूर या दोघा कलाटे बंधुवर गंभीर स्वरुपाचे आरोप करणारे प्रसिध्दीपत्र काढले होते. त्यात तू खूप पैसे कमावले आहेस, त्यामुळे एक कोटी रुपये दे, अशी मागणी करून कलाटे बंधूंनी मारहाण केल्याचे विलास मडिगेरी यांनी पोलिसांना सांगतिल्याचे म्हटले होते. त्याशिवाय भूसंपादनासाठी खासगी वाटाघाटी नको तर टीडीआर प्रमाणे मोबदला द्यावा म्हणून मडिगेरी यांची भूमिका होती, ते एक कारण होते. महापालिका कर्मचारी महासंघाटने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी योजना पाहिज असा आग्रह धरला असताना विमा योजना लागू केली म्हणून मडिगेरी यांच्यावर राग काढला असाही भाजपाचा सूर होता. या आरोप- प्रत्योरापांच्या निमित्ताने अनेक गोष्टींचा भंडाफोड होईल अशी एक शक्यता होती. स्थायी समितीमधील कथित टक्केवारीचा हिशोब विलास मडिगेरी यांनी एकाही सदस्याला दिला नाही असाही आक्षेप होता. त्यावर अधिक चर्चा होईल आणि पक्षाचीच अधिक बदनामी होईल, अशी भिती वाटल्याने चर्चा झाला नाही आणि प्रकरण मिटविण्यात आले असेही सांगण्यात आले.
भूसंपादन आणि धन्वंतरी या दोन विषयांवर शहराच्या राजकीय हालचालीत महत्वाचे घटक असलेले बहुतांश गाववाले हे कलाटे बंधुच्या बाजुने उभे राहिले. किरकोळ मारहाण झाली, असा सूर भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीच लावला होता. भूसंपादनाच्या विषयातही भाजपा नगरसेवकांमध्ये उभी फूट पडली होती. त्यामुळे मारहाण झाली पण बाजू घ्यायलाही कोणी तयार नसल्याने विलास मडिगेरी जवळपास एकाकी पडले. धन्वंतरी योजनेच्या विषयावर महापालिकेचे सात हजार कर्मचारी एका बाजुला होते आणि महापालिकेचे पदाधिकारी दुसऱ्या बाजुने होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी, धन्वंतरी रद्द करून विमा योजना लागू करण्यासाठी विलास मडिगेरी यांनी सात कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप थेट भाजपाच्या दिशेने आणि भर सभागृहात केला होता. त्यातही भाजपाला बदनामीची भिती वाटली आणि किमान यापुढे अधिक वाच्यता नको म्हणून मारहाणीचे प्रकरण गुंडाळण्यात आले, अशी चर्चा आहे.
कलाटे बंधुनी पैसे मागितले असा आरोप केला, पण प्रत्यक्षात तसे परिस्थितीजन्य पुरावे देता आले नाहीत. त्यातच कलाटे बंधुनी त्यांच्या जागा ताब्यात दिलेल्या नाहीत, असे भाजपाने प्रसिध्दीपत्रात नमूद केले आहे. त्यावरून कलाटे कंपनी मुळातच जमीनदार, खानदानी गडगंज असल्याने हे भांडण पैशाचे नाही, तर भूसंपादन, टीडाआर मार्केटशी संबंधीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. संपूर्ण विषयाचा उलगडा होत गेला तसतसे भाजपाच्या नगरसेवकांनी एक एक करत अंग काढून घेतले. त्यानंतर प्रकरणा एकदम थंड पडले. त्यामुळे विलास मडिगेरी यांना बेदम मारहाण होऊनही त्यांच्या समर्थनासाठी म्हणावे त्या प्रमाणात भाजपा पुढे आलाच नाही. १२८ पैकी तब्बल ७७ नगरसेवक सत्ताधारी भाजपाचे आहेत. त्याशिवाय ३ स्विकृत आणि ५ अपक्षांचे पाठबळ मिळून जवळपास ८५ सदस्यांचे संख्याबळ पाठिशी असूनही भाजपाचे आळी मिळी गुपचिळी का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.