विरोधी पक्ष नेत्यांनी माझ्याशी एका व्यासपीठावर चर्चा करावी; मुख्यमंत्र्यांचे आव्हान

0
668

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि महाराष्ट्रातले भाजपचे सरकार यांनी चार वर्षांच्या काळात विकासाचे काम केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कितीही आकांडतांडव केले, महाआघाडी केली तरी देश आणि राज्यात जास्त जागा जिंकून भाजपचेच सरकार येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पंधरा वर्षांच्या काळातील कामे आणि आमच्या चार वर्षांतील विकासकामे यांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्याशी एका व्यासपीठावर चर्चा करावी, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना दिले.

प्रदेश भाजपच्या कार्यसमितीला संबोधित करताना फडणवीस बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्‍या आयुषमान भारतमुळे देशातील ५० कोटी जनतेच्या आरोग्‍यविषयक समस्या सुटणार आहेत. प्रत्येकाला ५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातही उच्च दर्जाच्या आरोग्‍यसुविधा उपलब्‍ध होणार आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रात ७० वर्षांत केवळ ५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले. परंतु, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्‍यात १५ हजार किमीच्या राष्ट्रीय महामार्गांची भर घालण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात सिंचनक्षेत्रात भ्रष्टाचार होता. पैसे मंत्र्यांच्या तिजोरीत गेले. मात्र जमिनीचे, शेतकऱ्याचे सिंचन होत नव्हते. आम्‍ही सिंचन क्षेत्रातील कंत्राटदारी मोडीत काढली. गेल्‍या साडेतीन वर्षांत १३ लाख हेक्टरने सिंचनक्षमता वाढविली’, असेही ते म्हणाले.