Desh

विरोधी पक्षांचे सरकार आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना हवंय उपपंतप्रधानपद

By PCB Author

May 11, 2019

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांनंतर भाजपला बहुमत मिळालं नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी होकार दर्शवला आहे. पण त्याचवेळी त्यांनी आघाडी सरकारमध्ये उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशावेळी पुढचे सरकार कोणाचे होणार याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षित बहुमत मिळालं नाही तर देशातील विरोधी पक्षांचे आघाडी सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात २१ मेला सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीशी आणि काँग्रेसशी राव यांनी चर्चा केली आहे. भाजपला पाठिंबा न देता प्रस्तावित महाआघाडीला समर्थन देण्यास त्यांनी होकार दिला असून त्या बदल्यात उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे. तसं झाल्यास त्यांच्या मुलगा जगन्नाथ रावला तेलंगणाचे मुख्यमंत्री करण्यात येईल.

चंद्रशेखर राव आतापर्यंत कधीच राष्ट्रीय राजकारणात सक्रियपणे सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या या मागणीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. काँग्रेस किंवा डाव्या पक्षांनी याबद्दल काहीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ‘ नव्या सरकारबद्दल आता काहीच आडाखे मांडता येणार नाहीत. सगळेच निर्णय निवडणुकानंतरच घेण्यात येतील.’ असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सध्या सातत्याने राव यांच्या संपर्कात आहे.

दुसरीकडे तेलंगणातील वायएसआर काँग्रेसच्या जगन्नाथ रेड्डींनी मात्र आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. तेलंगणात लोकसभेच्या एकूण १७ जागा आहे. २०१४मध्ये यापैकी १३ जागांवर टीआरएसने विजय मिळवला होता. यावेळीही या पक्षाला १०-१५ जागा तेलंगणात मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जी सत्ता स्थापनेबद्दल महत्त्वपूर्ण चर्चाही केली आहे. जसजशा निवडणुकीचे निकाल जवळ येत आहेत तसं तसे देशातील राजकीय वातावरण तापते आहे. तेव्हा देशाचा पुढचा पंतप्रधान होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.