विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे पद धोक्यात

0
1707

अनधिकृत जनसंपर्क कार्यालयामुळे शितल काटेही अडचणीत

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचे आणि त्यांच्या सौभाग्यवती शितल काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. पिंपळे सौदागर येथील शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील त्यांचे जनसंपर्क कार्यालय बांधकाम परवानगी नियम धाब्याबर बसवून उभारण्यात आले आहे. इमारतीच्या सामासिक अंतरात (साईड मार्जिन) जनसंपर्क कार्यालय आणि पत्र्याचे शेड बेकायदेशीरपणे थाटणाऱ्या नाना काटे आणि शितल काटे यांचे नगरसेवक पद तातडीने रद्द करा, बेकायदेशीर कार्यालय जमीनदोस्त करा अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा भाजपा नगरसेविका तथा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी दिला आहे. यामुळे काटे दाम्पत्याचे धाबे दणाणले आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात सिमा सावळे यांनी म्हंटले आहे की, पिंपळे सौदागरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाना काटे यांचे आणि त्यांच्या सौभाग्यवती शितल काटे यांचे सर्व्हे क्रमांक १८३ येथील शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय बांधकाम परवानगीचे सर्व नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड) नुसार नगरसेवकाने किंवा त्याच्या नातलगाने अनधिकृत बांधकाम केल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. या कायद्यानुसार नाना काटे आणि शितल काटे हे दोघेही नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. पिंपरी  चिंचवड शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकाच्या राहत्या घरावर बुलडोझर फिरवते. मात्र, विरोधी पक्षनेते असलेल्या नाना काटे यांच्या राजकीय दहशतीमुळे महापालिका प्रशासन पाडापाडी कारवाई करायला धजावत नाही, ही संतापाची बाबा आहे. 

माहापालिका आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन बेकायदेशीरपणे उभारलेले जनसंपर्क कार्यालय तातडीने पाडावे, तसेचकाटे दामपत्याचे  नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करावी, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा नगरसेविका सिमा सावळे यांनी दिला आहे.