Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी – बाळासाहेब थोरात

By PCB Author

January 16, 2020

मुंबई,दि.१६(पीसीबी) – काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करुन आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला ट्विट करुन लगावला आहे.

संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचं होतं, त्यावर आमची नाराजी होती. आम्ही ती उद्धव ठाकरे यांना कळवली. भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडला आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 16, 2020

दिवंगत इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. ज्या करीम लाला बद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करुन त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये, असा सल्लाही थोरातांनी फडणवीसांना दिला आहे.