विराट कोहली, मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

0
793

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.

इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब विराटला मिळाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने उल्लेखनीय खेळी केली. विराटने या मालिकेत सर्वाधिक ५९३ धावा केल्या आहेत.

मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याशिवाय, २०१७ मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.