Desh

विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम; एकदिवसीय सामन्यात १० हजार धावा

By PCB Author

October 24, 2018

विशाखापट्टणम, दि. २४ (पीसीबी) – वेस्ट विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. 

पहिल्या सामन्यातील १४० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर २१२ एकदिवसीय सामन्यात २०४ डावांत ९९१९ धावा जमा झाल्या होत्या. त्यानंतर आज ८१ धावांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३६ शतके आणि ४९ अर्धशतके साजरी केली आहेत.

दुसऱ्या सामन्यात ४४ धावांवर असताना मॅकॉय या गोलंदाजाच्या चेंडूवर  कोहली खेळत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच उडाला. परंतु  होल्डरला त्या चेंडूचा झेल घेता आला नाही. त्यामुळे कोहली जीवदान मिळाले. दरम्यान, दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोहली पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.