Sports

‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स

By PCB Author

July 11, 2018

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे; पण ‘माईंडगेम’ला आतापासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट कमिन्सने, ‘यंदा विराटला ऑस्ट्रेलियात शतकच करू देणार नाही…’, असे सांगत दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे आपल्या स्वतःच्याच वक्तव्याला तो धाडसी अन् जिगरबाज म्हणतो. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार असून या दौऱ्यावर टीम इंडिया चार कसोटी, तीन टी-२० आणि तीन वनडेंची मालिका खेळणार आहे. मंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एक कार्यक्रम पार पडला. तिथे कमिन्सची उपस्थिती होती. यावेळी तो म्हणाला, ‘माझे धाडसी अन् ठळक भाकीत… मला हे सांगायला आनंद होतो आहे की, विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक करू शकणार नाही. आम्ही त्याला तशी खेळी करूच देणार नाही’. विराटची कसोटीतील सरासरी ५३.४० असून फक्त ऑस्ट्रेलियातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्याने कांगारूंच्या भूमीत ६२च्या सरासरीने कसोटी धावा वसूल केल्या आहेत. गेल्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला तेव्हा विराटने चार कसोटींत चार शतके ठोकत ८६.५०च्या सरासरीने ६९२ धावा तडकावल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाने २०१७मध्ये भारत दौरा केला, तेव्हा मात्र त्यांनी विराटची बॅट थंडच ठेवण्यात यश मिळवले होते. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटला तीन कसोटींत मिळून फक्त ४६ धावा करता आल्या होत्या.