Desh

विराटचे स्थान ढासळले, घसरला थेट शंभराव्या स्थानावर

By PCB Author

June 12, 2019

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्स मासिकाच्या मानाच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. जगभरातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या शंभर जणात विराटने स्थान मिळवले आहे. मात्र या वर्षी विराटच्या स्थानामध्ये घसरण झाली असून तो थेट शंभराव्या स्थानावर फेकला गेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत विराट ८३ व्या जागेवरुन थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.

विराट कोहलीच्या वार्षिक कमाईमध्ये यंदा अंदाजे ७ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. १७३ कोटी वार्षिक कमाई करुनही विराटचे स्थान घसरले आहे. या यादीमध्ये अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी पहिल्या स्थानी आहे. मेसीने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. मेसीची कमाई ही अंदाजे ८८१.७२ कोटींच्या घरात गेलेली आहे. तर रोनाल्डाने गेल्या वर्षभरात ७५६.३५ कोटी कमावले आहेत.

या यादीमध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराटच्या तुलनेत मेसीची कमाई पाच पटीने अधिक आहे. खेळाडूंचा वार्षिक पगार, स्पर्धांमधून जिंकलेली रक्कम, जाहीरातींमधून मिळणारा पैसा यावरुन फोर्ब्सच्या यादीमधले स्थान ठरवले जाते.