विमानाच्या पंखांना जैवइंधनाचे बळ; भारताची ऐतिहासिक भरारी     

0
1091

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – जैवइंधनावर विमानाने यशस्वी उड्डाण केल्याने  भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आज (सोमवार) इतिहास रचला आहे.  या क्षेत्रात भारताने ऐतिहासिक भरारी घेतली आहे. या यशामुळे जैवइंधनावर विमान उड्डाणाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंगतीत   भारत जाऊन बसला आहे.

स्पाईसजेटच्या ‘क्यू ४००’ या विमानात जैवइंधन भरून डेहराडून ते दिल्ली अशी चाचणी घेण्यात आली. डीजीसीए व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. तब्बल २५ मिनिटे हे विमान अवकाशात घिरट्या घालत होते.

या विमानात २५ टक्के जैवइंधन वापरले होते. जैवइंधनाच्या वापरामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते. तसेच सध्याच्या इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत ते कमी लागते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने जेट्रोफाच्या बियांपासून या इंधनाची निर्मिती केली आहे.

दरम्यान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकका या देशांनी जैवइंधनावर आधारित विमानाच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी केली आहे. मात्र, विकसनशील देशांमध्ये अशी चाचणी घेणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. जगातील पहिल्या जैवइंधन विमानाने या वर्षी सुरुवातीलाच लॉस एंजलिस ते मेलबर्न असे उड्डाण केले होते.