विमानतळ खेडला होण्यासाठी एकत्र येऊया; खासदार डॉ. अमोल कोल्हे अन् आमदार महेश लांडगे यांची एकमेकांना पत्राद्वारे साद

0
403

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर विमानतळ खेडला होण्यासाठी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लेखी पत्राद्वारे साद घातली. डॉ. कोल्हे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लांडगे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ शिरुर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यात येण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शिरुरच्या सर्वांगीण व शास्तवत विकासासाठी खेड तालुक्यात विमानतळ होण्यासाठी सर्वांनी पक्षीय मतभेद विसरुन प्रयत्न करायला हवेत असे पत्र खासदार डॉ. कोल्हे यांना दिले. बैलगाडा शर्य लढ्याप्रमाणे एकत्र येणे अपेक्षित आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. खासदार म्हणून आपण राज्य सरकार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात विमानतळासाठी प्रयत्न करावेत.

केंद्र सरकारमधील संबंधित मंत्रालयाकडे पाठपूरावा करण्याची विनंती आमदार लांडगे यांनी केली. पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालायची असेल. येथील इंटस्ट्रिअल व रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यायचा असेल. तर, शहरालगत असलेल्या खेड तालुक्यात विमानतळ उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले मार्गदर्शन, प्रयत्न मोलाचे ठरणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार लांडगे म्हणाले.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या भूमिकेचे स्वागत करत आमदार लांडगे यांना लेखी पत्र दिले. त्यात खासदार डॉ. कोल्हे म्हणतात, विकासात कोणतेही राजकारण असता कामा नये ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो आहे. त्यामुळे खेड विमानतळासाठी पक्षविरहित प्रयत्न व्हावेत. यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. तसेच या विषयाची सखोल माहिती घेऊन त्यानुसार पाठपुरावा करण्याचे आश्वासन देतो. मतदारसंघातील विकासकामांविषयी सदैव स्वागतच आहे.

औद्योगिक पट्ट्यातील मोठा कर्मचारी वर्ग भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असून दररोज वाहतूक कोंडीला सामोरा जातो. या कर्मचारीवर्गाला दिलासा देण्यासाठी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी टप्प्यातील रस्त्याचे भूसंपादनाअभावी रखडलेले कामही मार्गी लागणे आवश्यक आहे. पिंपरी महापालिकेकडून ही भूसंपादन प्रक्रिया लवकर झाल्यास सहापदरीकरणाच्या कामाला गती मिळेल. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपल्या पक्षाची सत्ता असून या भूसंपादनासाठी आपले सहकार्य लाभावे अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.