Maharashtra

विनायक मेटेंना रात्रीतून मुंबईला कुणी बोलावलं ? चौकशी करण्याची मागणी

By PCB Author

August 14, 2022

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र, हा अपघात होता की घातपात? असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. तर दुसरीकडे, विनायक मेटेंना रात्रीतून मुंबईला कुणी बोलावलं याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

विनायक मेटेंच्या निधनावर सावतांचा शोक विनायक मेटेंची अपघाती निधनाची बातमी अतिशय दु:खदायक आहे. १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यपाल नामनियुक्त सदस्य नेमले होते त्यात माझं आणि मेटेंच नाव होतं. आणि तिथून आमची मैत्री सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी सुमुद्रात पुतळा उभा करण्याची इच्छा विनायक मेटेंची होती. मराठा आरक्षण आणि विकासाठीही ते आग्रही होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मेटेंची कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वाटत असल्याचा संशय सावंतांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने याबाबत चौकशी करावी विनायक मेटेंना रात्री मुंबईला कुणी बोलावलं याची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने उच्च दर्जाचे अधिकारी नेमून याची चौकशी केली पाहिजे. मेटेंच्या कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. मेटे कुटुंबाला गरज पडल्यास सर्व प्रकारची मदत करण्यास शिवसेना तयार असल्याची प्रतिक्रिया अरविंद सामंतांनी दिली आहे.

अपघात की घातपात? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चालकाच्या डुलकीमुळे हा अपघात झाला असण्याचा संशय व्यक्त केला असताना दुसरीकडे बराच वेळ रुग्णवाहिका न पोहोचणं, आजूबाजूच्या कुणीही मदत न करणं या गोष्टींवरून या घटनेमध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? असा सवालही त्यांनी राज्यसरकारला विचारला आहे.