विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; जिवंत काडतुसासह पिस्तुल जप्त

0
265

चाकण, दि. २३ (पीसीबी) – विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली. त्याच्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई मेदनकरवाडी फाटा, मेदनकरवाडी येथे गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली.

मुकुंद नारायण हापटे (वय 19, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह सत्यम उर्फ पप्पू दत्तात्रय कडरा (रा. कडाचीवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई राजकुमार दामोदर हनुमंते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथे मदनकरवाडी फाट्यावर असलेल्या पूनम वॉशिंग सेंटरसमोर एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लाऊन आरोपी मुकुंद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा 41 हजार रुपयांचा ऐवज आढळला. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतूस जप्त केले. हे पिस्तुल मुकुंद याला त्याचा मित्र आरोपी सत्यम याने दिल्याचे मुकुंद याने सांगितले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुकुंद याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.