विनापरवाना दुकानात ज्वलनशील पदार्थ साठवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

0
353

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – इको ग्रीन एनर्जी नावाने दुकान सुरु करून त्यामध्ये विनापरवाना ज्वलनशील पदार्थांची विक्री केली. तसेच दुकानात ज्वलनशील पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतेही कागदपत्र, परवाना आणि सुरक्षेची साधने उपलब्ध न करता शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्हार नामदेव पोटवडे (वय 30, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए एस हिवरकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार याने इको ग्रीन एनर्जी या नावाचे दुकान सुरु केले. दुकान कायदा आणि इनव्हाईस बिलावर एमआयडीसी पिंपरी येथील पत्ता दिला. आरोपीने या व्यवसायासाठी लागणारे लुब्रीकेटिंग ऑईल अॅंड ग्रीस प्रोसेसिंग सप्लाय, डीस्ट्रीब्युशन व रेग्युलेशन अन्वये ट्रेडिंग लायसन्स, उत्पादन परवाना, अग्निशमन दलाचा परवाना, महराष्ट्र प्रदूषण महामंडळ, सेन्ट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड दिल्ली यांचा परवाना, ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्याचा परवाना काढला नाही.

कुठलेही परवाने नसताना दुकानात 17 लाख 65 हजार 850 रुपये किमतीचा ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवला. ज्वालाग्राही पदार्थांबाबत हयगयीचे वर्तन केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मल्हारी याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.