विनयभंग करणाऱ्याचा प्रतिकार करत तरुणीची रिक्षातून उडी

0
607

अंबड, दि, २१ (पीसीबी) – विनयभंग करणाऱ्याचा प्रतिकार करत तरुणीने रिक्षातूनच उडी घेत स्वत:ची सुटका केल्याचा प्रकार अंबड येथे गुरुवारी  घडला. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार  लक्षात येताच त्यांनी रिक्षा रोखून चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उत्तमनगर येथील महाविद्यालत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करुन एक तरुणी रिक्षाने (एमएच १५/एके ६६८५) घराकडे जात होती. मात्र, रिक्षाचालक रवी शंकर गोफन (वय २२, गौतमनगर) याने या तरुणीशी रिक्षा चालविताना अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी रिक्षात बसली असता रिक्षाचालकाने तिचा हात पकडून ‘तू मुझे अच्छी लगती है’ असे म्हणत तिची छेड काढली. त्याचवेळी तरुणीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, रिक्षा न थांबवल्यामुळे तरुणीने घाबरून रिक्षातूनच उडी घेतली.

यामुळे तरुणीच्या हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली. चालू रिक्षातून तरुणीने उडी घेतल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी रिक्षाचालकास रोखून येथेच्छ चोप देत इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ मोरे तपास करीत आहेत.