विधान परिषदेत भाजप मंत्र्यांच्या मदतीला शिवसेनेचे मंत्री धावले !

0
517

नागपूर, दि. १७ (पीसीबी – राज्यातील वैद्यकीय प्रवेशावरुन आज (मंगळवारी) विधान परिषदेत वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन थेट वेलमध्ये आल्याने सत्ताधारी पक्षाची नाचक्की झाली. यावरून विरोधकही आक्रमक झाले. खुद्द मंत्रीमहोदय वेलमध्ये कसे काय येतात ? असा सवाल करून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर  पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वेलमध्ये येऊन गिरीश महाजन यांना बाकावर बसले.

वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण आहे. तरीही पुन्हा प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप विरोधकांनी केला. ७०- ३० धोरणामुळे अन्याय होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. यावर वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात निवेदनही दिले. मात्र, यावर विरोधकांचे समाधान झाले नाही.

या मुद्द्यावर आमदार अमर काळे आणि सतीश चव्हाण यांनी गदारोळ केला. शेवटी यावर महाजन म्हणाले, तुमचे सरकार असताना तुम्ही नवीन महाविद्यालये का नाही सुरु केली. महाजन यांच्या या विधानाने विरोधक आणखी आक्रमक झाले. मंत्री उत्तर देण्यास सक्षम नाही, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. विरोधी बाकांवरील आमदार उपासभापतींसमोरील वेलमध्ये घोषणाबाजी करु लागले. त्यांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी बाकावरचे आमदारही वेलमध्ये आले.