Maharashtra

विधानसभेला युतीचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला – चंद्रकांत पाटील  

By PCB Author

June 02, 2019

औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक  शिवसेना-भाजप युती  एकत्र लढणार आहेत. त्यासाठी युतीचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे,  अशी माहिती  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (रविवार) येथे दिली.   भाजप १३५ आणि शिवसेना १३५  विधानसभेच्या जागा लढेल. मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.  

मंत्री पाटील मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले  होते. यावेळी ते बोलत होते. भाजप-शिवसेना विधानसभेत एकत्रच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ जागांवर युती लढेल. त्यातील १८ जागा या युतीतील मित्र पक्षांना सोडण्यात येतील. तर, पूर्वी ठरल्याप्रमाणे भाजप १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे युतीच्या या जागावाटपात काही बदल होणार नाहीत. विधानसभेलाही शिवसेना-भाजप, मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवेसनेच्या बंडखोर आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यात भाजपचा काही प्रश्न नाही, असे सांगत पाटील यांनी खैरे यांच्या पराभवाला शिवसेनेला दोषी ठरवले.