Maharashtra

विधानसभेत सरकारची मध्यरात्रीपर्यंत काेंडी; शेतकरीप्रश्नी खाेत अडचणीत

By PCB Author

July 17, 2018

नागपूर, दि. १७ (पीसीबी) – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देणारे कृषी राज्यमंत्री  सदा खोत यांची विरोधकांनी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत विधानसभेत चांगलीच कोंडी केली. बोंडअळी, धानाच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने शेतकऱ्यांना आजवर १००९ कोटींचे वाटप केले. बियाणे कंपन्यांना ९२ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले, असे खोत यांनी सांगितले. मात्र त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही.

दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हेक्टरी ३० हजारांची मदत देण्याची घोषणा सभागृहात केली होती, त्याचे काय झाले? यापैंकी हेक्टरी किती मदत दिली हे जाहीर करा? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नही तोपर्यंत सभागृह सोडणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. त्यामुळे मध्यरात्री बारा वाजेनंतरही हा गोंधळ सुरूच होता.