Banner News

विधानसभेत ‘अब की बार २२० पार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

By PCB Author

June 25, 2019

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होणार आहेत. त्यामळे युतीच्या विधानसभेत २२० जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त करून ‘अब की बार २२० पार’ या घोषणेचा पुनरूच्चार पुण्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केला.

पालकमंत्री पाटील यांनी आज मोरवाडीतील पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे,  भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत २२८ मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य युतीने ठेवले आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करावी, अशा सुचना पाटील यांनी यावेळी केल्या.