विधानसभेच्या १० जागा ‘रिपाइं’ला सोडाव्यात; रामदास आठवले यांची मागणी

0
354

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि रिपाइंसह मित्रपक्षांची महायुती एकत्रित निवडणुकीला सामोरी जाणार असल्याने रिपाइंला राज्यात किमान १० जागा सोडाव्यात आणि सत्तेत वाटा देताना आणखी एका महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

रामदास आठवले यांनी शनिवारी रात्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, काकासाहेब खंबाळकर, हेमंत रणपिसे, प्रवीण मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

राज्यभरातील २४ जागांवर चर्चा करून त्यापैकी १० जागा पक्षाला सोडण्यात याव्यात अशी मागणी आठवले यांनी पाटील यांच्याकडे केली. त्यावर विजय निश्चित असलेल्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येतील. विधानसभानिहाय विचारविनिमय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झाल्यानंतर कोणत्या जागा रिपाइंला सोडणार हे कळवण्यात येईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. पक्षाला आणखी एक महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात यावे. तसेच कार्यकर्त्यांना विविध महामंडळांच्या सदस्यपदी लवकरात लवकर नेमावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.