विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार

0
428

पुणे, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व अंदाज घेऊन विधानसभेसाठी १० जूनला मतदारसंघाची घोषणा करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी रविवारी जाहीर केले. त्यामुळे, पुढील चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासूनच केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिले.

सृजन फाउंडेशन आणि रोहित दादा पवार मित्र परिवारातर्फे राज्यातील दुष्काळी भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुढील महिन्यात मतदारसंघाची निवड करणार असल्याचा दावा केला. रोहित पवार यांनी पुण्यातील हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात आहे. तर, पवार हे नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास अधिक अनुकूल आहेत.

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर त्यांचे दुसरे नातू रोहित पवार आता विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पवार सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, इतर मतदारसंघातून त्यांच्या नावाबाबात चर्चा सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नगर जिल्ह्यातील अनेक तरुणांनी ‘कर्जत-जामखेड मधून नक्की लढा,’ असा आग्रह धरला, तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला कुणाल गांधी, हर्षवर्धन पवार, ओम कट्टे, मारुती अवरगंड, आकाश झांबरे, ऋषिकेष जगदाळे, तुषार गाडे उपस्थित होते.