विधानसभा बरखास्तीनंतर तेलंगणा राष्ट्र समितीच्या १०५ उमेदवारांची यादी जाहीर

0
576

हैदराबाद, दि. ६ (पीसीबी) – तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (गुरूवार) केली. त्यानंतर काही वेळाने राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने १०५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यात पक्षाच्या दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. तर सध्या लोकसभेत खासदार असणारे पीड्डापाल्ली बी सुमन विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

चंद्रशेखर राव यांच्या सरकारने आज एकमताने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकारचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंत आहे. तत्पूर्वीच टीआरएस सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान, राव हे ६ तारीख शुभ मानतात. त्यामुळेच त्यांनी आज हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा बरखास्त केल्यानंतर राव हे रंगारेड्डी जिल्ह्यातून एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली होती.