विधानसभा निवडणुकीत विजय आमचाच!- देवेंद्र फडणवीस

0
340

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  ‘काँग्रेसमध्ये कोणी नेताच दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. शरद पवार यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतो. निवडणुकीत विजय आमचाच होणार असून, आम्हाला पातळी सोडून बोलता येणार नाही’, असे सांगत, ‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमताने निवडून येईल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. त्याचवेळी, ‘शिवसेनेचा विरोध असलेला नाणार प्रकल्प कोकणातच होणार असून महिन्याभरात मी स्वतः त्याची घोषणा करणार आहे’, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

प्रचाराच्या धबडग्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ‘मटा’शी संवाद साधला. ‘विधानसभा निवडणुकीत फार चुरस नसून काय होईल ते स्पष्टच दिसते आहे. तसेच, यावेळी कमळ या चिन्हावर मतदान होणार असल्याने आम्हाला बंडखोरीचाही फार फटका बसणार नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा आम्हीच सत्ता स्थापन करणार यात मला काही अडचण वाटत नाही’, असे फडणवीस यांनी नमूद केले. या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांची संख्या अभूतपूर्व असेल, तर विरोधकांची संख्या अभूतपूर्व कमी झालेली असेल, असे भाकित त्यांनी वर्तवले.