Maharashtra

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १३ सप्टेंबर रोजी – रावसाहेब दानवे   

By PCB Author

September 01, 2019

जालना,  दि. १ (पीसीबी) – राज्यात  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या १३ सप्टेंबर रोजी  लागू होणार आहे. आचारसंहितेसाठी अवघे  १२ दिवसच राहिले आहेत, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना केल्या.

जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात रावसाहेब दानवे  बोलत होते.  दानवे यांच्या या विधानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधीच दानवे यांनी गणपतीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचा गौप्यस्फोट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही  गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागणार असल्याचे म्हटले होते.  १५ ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणुका होतील, असेही मुनगंटीवार म्हणाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तारीख गणेशोत्सवानंतर  जाहीर होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.