विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची तयारी सुरू;  २१ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

0
286

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  २१ जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडेल.

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोरेगावातील नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात २२० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. विधानसभा निवडणुकीत युतीला २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. तरी भाजपाला १२२ जागांवर तर शिवसेनेला ६३ जागांवर यश मिळाले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रभाव दिसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.