Pune

विधानपरिषदेत धडा शिकवला, आता चिंचवड, कसब्यात जागा दाखवून देऊ

By PCB Author

February 10, 2023

पुणे, दि. १० (पीसीबी) : हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं असल्यांचं सतत सांगितलं जातं. मात्र हे सरकार घटनाबाह्य आहे, स्थगिती सरकार आहे. त्या सरकारला विधानपरिषदेत मतदारांनी धडा शिकवला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातूनही या सरकारला जागा दाखवून देऊ, अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे केले आहे.

अजित पवार म्हणाले की, विधानपरिषदेच्या नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकणात निवडणुका झाल्या. त्यात फक्त कोकण येथे भाजपला यश मिळालं आहे. मात्र तेथील ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना नाकारून घटनाबाह्य सरकारला जागा दाखवून दिली आहे. आताही कसबा आणि चिंचवड विधानसभेत त्यांचा पराभव करावा. यातून गद्दारांना मतदार कसे नाकारतात, हे देशाला दाखवून देण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी थोडेच दिवस बाकी आहेत. कमी दिवस असल्याने नेटाने काम करा. कसब्यात काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्याासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन पावर यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी एकजुटीची ताकद महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी मतदारांचे विभाजन झाल्याने या ठिकाणी भाजपचा विजय होत होता. आज स्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडी आणि इतर पक्ष एकत्र आहेत. त्यामुळं मतांची विभागणी होणार नाही. आता आपली एकजूट राहिली पाहिजे. त्यातून आपला विजय निश्चित होईल, असाही विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.