Pune

विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना सर्जनशीलता जागृत ठेवावी – अभिनेत्री स्मिता गोंदकर

By PCB Author

February 16, 2019

पुणे, दि. १६ (पीसीबी) – विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना स्वतःमधील सर्जनशीलता जागृत ठेवावी, असे आवाहन अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी केले.

शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘शिवांजली’ च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती, संस्थेचे सहसचिव श्री सुरेश शिंदे, संस्थेचे खजिनदार अजय पाटील, साहेबराव जाधव, भगवानराव साळुंके, निखिल कणसे, राहुल यादव, धवल जितकर आदी उपस्थित होते.

मालोजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या आदर्श तत्त्वावर चालणारी संस्था शतकोत्तर वाटचाल करीत असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमने यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.यावेळी महत्त्वाच्या पारितोषिकांचे वितरण प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. बेस्ट आउटगोइंग स्पोर्ट्स मन पुरुष अभिजीत कदम, बेस्ट आउटगोइंग स्पोर्टस वुमन सिमोना वागळे, बेस्ट परफॉर्मर कल्चरल पुरुष ऋग्वेद शिंदे, बेस्टआउटगोइंग कल्चरल परफॉर्मर स्त्री मानसी सायरे, बेस्ट आउट गोइंग राष्ट्रीय सेवा योजना कार्यकर्ता वरद पाटील, बेस्ट आउट गोइंग राष्ट्रीय सेवा योजना कार्यकर्ती हर्षदा पाटील, बेस्ट आउट गोइंग स्टुडन्ट ऑफ द इयर महेश वागस्कर यांना हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी ओव्हर ऑल ट्रॉफी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला प्रदान करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.