‘विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनासाठी विविध देशांशी करार’ : हर्षवर्धन पाटील

0
311

पीसीईटीचे ‘शैक्षणिक आंतरराष्ट्रीय संबंध’ प्रकल्पाअंतर्गत पंधराहून जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापिठांशी करार

पिंपरी,दि. 9 (पीसीबी) – ‘मेक इन इंडिया’ साठी अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्राची भुमिका महत्वपुर्ण आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांचे व संशोधकांचे मार्गदर्शन मिळाले तर त्यांची प्रगल्भता आणखी वाढीस लागेल. त्यातून नविन संशोधक, संशोधन विकसित होऊन मानवी जीवन अधिक सुखकर होण्यास उपयोग होईल. पीसीईटी मधिल विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने जगातील विकसित विविध देशातील नामांकित विद्यापिठांबरोबर पीसीईटीने करार केले आहेत. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने (पीसीईटी) आता गरुड झेप घेतली आहे ‘शैक्षणिक आंतरराष्ट्रीय संबंध’ प्रकल्पाअंतर्गत पीसीईटीने मागिल सहा महिन्यात अमेरिका, शिकागो येथिल इलीयॉनिस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (Illionios Institute of Technology, U.S. Chicago); युरोप मधिल डेन्मार्क येथिल आरहुस विद्यापिठ (Aarhus University, Denmark Europe) आणि मलेशिया मधिल मलाया विद्यापिठ (University of Malaya, Kualalumpur, Malaysia) अशा नामांकित विद्यापिठांसह पंधराहून जास्त विद्यापिठांबरोबर सामंजस्य करार केले आहेत.

मंगळवारी (दि. 7 सप्टेंबर) पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे ‘पिंपरी चिंचवड भारत – इटली एकत्रित संशोधन प्रकल्पा’च्या सामंजस्य करारावर सह्या केल्या. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय संबध संचालक डॉ. जान्हवी इनामदार, आंतरराष्ट्रीय संबध अधिष्ठाता डॉ. अनुराधा ठाकरे तसेच ए. जी. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पीसीईटीच्या वतीने युरोप, अमेरिकेतील नामांकित विद्यापिठांबरोबर मलेशिया, जपान, इटली, थायलंड, रशिया, युके मधिल नामांकित विद्यापिठांबरोबर शिक्षण, संशोधन ; उन्हाळी सुट्टीत कौशल्य आधारीत संशोधन प्रकल्प ; शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधन असे अनेक करार करण्यात आले आहेत. यामुळे पीसीईटीच्या आणि तळेगाव येथिल एनएमआयटीच्या शिक्षक, विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीसह, अल्पखर्चात शिकण्याची व संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीबरोबरच व्यवस्थापन आणि वास्तुविशारद शाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. यातून या नामांकित विद्यापिठांबरोबर एकत्रित शिक्षण व संशोधन प्रकल्प सुरु होतील. यामुळे ‘मेक इन इंडिया’ साठी उत्तम दर्जाचे उच्च शिक्षित अनुभवी, चिकित्सक प्रवृत्ती असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. त्याचा उपयोग देशाच्या औद्योगिक व आर्थिक क्रांतीसाठी होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात वाढ होईल याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.