विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाकडून आधुनिक शिक्षणाकडे कल वाढतोय – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

0
591

तळेगांव, दि. १२ (पीसीबी) – सध्या विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाकडून आधुनिक शिक्षणाकडे कल वाढत चालला आहे. विशेषत: उच्च शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे, हे याचेच द्योतक आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. मलघे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मलघे बोलत होते. यावेळई प्राध्यपक बी. के. रसाळ, डी. पी. काकडे, आर. आर. भोसले, के. व्ही. अडसुळ, एम. व्ही. देशमुख, क्रीडा विभागप्रमुख एस. आर. थरकुडे, डॉ. एस. एस. मेंगाळ, पी.के.पानकर आदी उपस्थित होते. दरम्यान, महाविद्यालाच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संभाजी मलघे यांचा वाणिज्य विभागातर्फे सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले, जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आधुनिक शिक्षण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाविद्यालय कटिबध्द आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना असून, विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामध्ये लवकरच व्हर्चुअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानातील ज्ञान ग्रहण केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून शिक्षणाचा जीवन जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असेही डॉ. मलघे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. काकडे यांनी केले तर, सूत्रासंचालन प्रा. पानकर यांनी केले.