Maharashtra

विद्यार्थी नापास झाला, तर पेन जबाबदार धरतो का ? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक सवाल

By PCB Author

August 24, 2019

जळगांव, दि. २४ (पीसीबी) – विद्यार्थी परीक्षेत नापास झाला, तर त्यासाठी आपण पेन जबाबदार धरतो का? तर नाही. नापास होण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यास, मेहनत आणि आकलन  जबाबदार असते,  असा उपरोधिक टोला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ईव्हीएम विरोधात  तक्रार करणाऱ्या  विरोधकांना  लगावला आहे.  

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शनिवार)  भुसावळमध्ये  पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी  विरोधी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला.  राज्यातील विरोधी पक्षांनी सध्या ‘ईव्हीएम’वरून मोट बांधण्याचा  प्रयत्न सुरू केला आहे.  त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी हेच विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते. मात्र, मोदींना शिव्या देऊन काही होणार नाही, हे आता त्यांना कळून चुकले आहे.  जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांना जे कळत आहे. ते राज्यातील इतर नेत्यांनाही लवकरच कळेल, असे ही ते म्हणाले.