विद्यार्थिनी, शिक्षिकांना डोळा मारतो; पहिल्याच्या वर्गातील विद्यार्थ्याची शाळेतून हकालपट्टी

0
625

पंढरपूर, दि. १७ (पीसीबी) – पहिलीच्या वर्गात शिकत असलेला  सहा वर्षांचा मुलगा विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना डोळा मारतो, अश्लिल वर्तन करतो, असे आरोप करत त्या विद्यार्थ्याची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली. याबाबत  लेखी पत्र शाळेने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला दिले आहे. हा प्रकार पंढरपुरातील एका शाळेत घडला आहे.

या विद्यार्थ्याला राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत या शाळेत प्रवेश मिळाला होता. शाळेने फी मागायला सुरुवात केली. तडजोड करुन ही फी भरल्याचा दावा पालकांचा आहे. मात्र, शाळेने केलेले हे आरोप अत्यंत निराधार, लाजिरवाणे आणि बिनबुडाचे आहेत, असे  पालकाने  म्हटले आहे.

तर मुलाच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. तसेच शाळेची गुणवत्ता खराब होऊ शकते. याचा विचार करून आपण त्याचा प्रवेश रद्द केल्याचे शाळा प्रशासनाने  सांगितले आहे. मात्र शाळेने या मुलावर केलेले आरोप इतके गंभीर आहेत की या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे.