Maharashtra

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला

By PCB Author

February 07, 2019

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – कर्णधार फैजल फजलच्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या  विजेतेपदावर नांव कोरले आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राला ७८  धावांनी धूळ चारली. विदर्भाने विजयासाठी दिलेल्या २०७ धावांचा पाठलाग  करताना सौराष्ट्राच्या संघाला १२७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाची  कामगिरी बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या ५ फलंदाजांना बाद करणाऱ्या आदित्यने दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या ६ फलंदाजांना तंबूत धाडले.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात आदित्य कर्णेवारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर३१२ धावांपर्यंत मजल मारली.  सौराष्ट्राने पहिल्या डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. स्नेल पटेलच्या शतकामुळे एका क्षणापर्यंत मजबूत वाटणारा विदर्भाचा संघ मोक्याच्या क्षणी कोलमडला. मात्र कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांनी अखेरच्या विकेटसाठी भागीदारी रचत विदर्भाच्या गोलंदाजांना जेरीस आणले. आदित्य सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात ५ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावातही विदर्भाच्या तळातील फलंदाजांनी  संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या फळीत गणेश सतीश तर मधल्या फळीतील फलंदाजांपैकी मोहीत काळे, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, उमेश यादव यांनी छोट्या पण निर्णायक खेळी केल्या. अखेरीस २०० धावांवर विदर्भाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर सौराष्ट्राला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात आले.