Pimpri

विठ्ठलनगरमध्ये तरुणाला तलवारीसह अटक

By PCB Author

July 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – स्वत: जवळ घातक अशी धारदार तलवार बाळगून परिसरात दहशत पसरवणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी शनिवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास विठ्ठलनगर, पिंपरी येथे केली.

गौतम श्रीराम मोरे (वय ३८, रा. बिल्डिंग क्र.६, रुम क्र.६०६, साईलिला हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, पिंपरी) असे तलवारीसह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात आर्म अॅक्ट अंतरर्गत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र आणि हत्यारे बाळगण्यास मनाई आदेश आहे. मात्र आयुक्त आर.के.पद्मनाभन यांचा हा आदेश झुगारुन आरोपी गौतम मोरे हा विठ्ठलनगर परिसरात दहशत माजवण्यासाठी स्वत: जवळ घातक तलवार बाळगत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी सापळा रचून गौतम याला २०० रुपये किमतीच्या तलवारीसह अटक केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.