विजांच्या कडकडाटासह पिंपरी-चिंचवडमध्ये बरसल्या जोरदार सरी; रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची नाराजी

0
471

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनचे आगमन न झाल्याने हिरमोड झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना गुरूवारी (दि. २१) दमदार सरींनी दिलासा दिला. दुपारी तीननंतर पाऊस जोरदार बरसल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांसह सर्व मैदानांवर जागोजागी पाणी साचले होते. तसेच विविध कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यामुळे अनेक रस्ते चिखलमय बनले होते.

मान्सून तळकोकणात सक्रिय झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात वेळेवर पाऊन दाखल होण्याच्या आशेने समाधानाचे वातावरण होते. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अचानक थांबल्याने मान्सूनही थबकला. त्यामुळे जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही शहरात मान्सून दाखल होईल की नाही अशी परिस्थिती होती. त्यातच वातावरणात उकाडा वाढल्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले होते. अशातच गुरूवारी (दि. २१) दुपारी तीननंतर शहरात पाऊस तुफान बरसला. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला.

गुरूवारी दुपारी पावणे तीननंतर शहरात काळे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दुपारी सव्वा तीननंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसू लागला. संपूर्ण शहरभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या सकल भागात तसेच प्रमुख मोठे रस्ते आणि अंतर्गत भागातील रस्त्यांसह मैदानांवर पाणी साचले. विविध कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदले गेले आहेत. या रस्त्यांवर डांबर न पडल्यामुळे राडारोडा रस्त्यांच्या शेजारीच पडला होता. पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते चिखलमय बनले. रस्त्यांवर चिखल पडल्यामुळे काही ठिकाणी गाड्या घसरण्याच्या घटनाही घडल्या. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.