विजय मल्ल्या हाजीर हो! दिल्लीच्या विशेष न्यायालयाचे समन्स

0
703

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रीग प्रकरणी २७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने आर्थिक अपराधी बिल २०१८ नुसार कोर्टात निवेदन दिले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने विजय मल्ल्याला समन्स बजावत २७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यामुळे कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

मद्य सम्राट विजय मल्ल्याने ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. काही दिवसांपूर्वीच मल्ल्याने एक प्रेस रिलिज काढत मी सरकारी बँकांचे कर्ज परत करण्यासाठी आवश्यक तेवढे सगळे प्रयत्न केले असल्याचे म्हटले होते. तसेच त्याने हा दावाही केला की मी कर्ज अदा करण्यासंबंधी २०१६ मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली होती. मात्र माझ्या पत्राला दोघांनाही काहीही उत्तर दिले नाही.

काही बँकांनी मला विनाकारण कर्जबुडव्या जाहीर केले आहे असाही आरोप विजय मल्ल्याने केला आहे. मल्ल्याने म्हटले आहे की, ‘नेते आणि मीडिया माझ्यावर अशा पद्धतीने आरोप करत आहे जणू काही मी नऊ हजार कोटींचे कर्ज घेऊन पसार झालो आहे. कर्ज देणाऱ्या काही बँकांना मला कर्जबुडव्याही घोषित केले आहे’. विजय मल्ल्याने सीबीआयने सरकार आणि बँकांच्या सांगण्यावरुन आपल्याविरोधात खोटे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचाही आरोप केला आहे.

मल्ल्याने ईडीने माझ्या आणि माझ्या ग्रुपच्या कंपनी, तसेच माझ्या आणि कुटुंबाचे मालकी हक्क असणाऱ्या कंपन्यांची संपत्ती जप्त केली असून त्याचे मूल्य १३ हजार ९०० कोटी असल्याचे म्हटले आहे. पुढे मल्ल्याने सांगितले आहे की, आपण बँकांचे कर्ज परत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत, मात्र आपल्याला बँकांना चुना लावणारा ‘पोस्टर बॉय’ म्हणून समोर आणले जात आहे. ‘मी सरकारी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. पण जर त्यात राजकारण होत असेल तर मी काही करु शकत नाही’, असे मल्ल्याने म्हटले आहे.