विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; केंद्रीय मंत्र्याचा सल्ला

0
412

हैदराबाद, दि. १४ (पीसीबी) – केंद्र सरकारमधील अनुसूचित जाती खात्याचे मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासी समाजातील तरूण उद्योजकांना अजब सल्ला दिला आहे. ‘केवळ हार्ड वर्कर बनू नका; फरार उद्योगपती विजय मल्लयासारखे स्मार्ट बना,’ असा सल्ला जुएल ओराम यांनी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हैदराबाद येथील पहिल्या राष्ट्रीय अनूसूचित जमाती उद्योजक संमेलनाला संबोधित करताना जुएल ओराम यांनी हा सल्ला दिला. ‘चुकीची कामे करण्यापूर्वी विजय मल्ल्याने उद्योग क्षेत्रात यश मिळविले होते. त्याने त्याचा उद्योग स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी,’ असे ओराम म्हणाले.

‘तुम्ही विजय मल्ल्याला शिव्या देता. पण मल्ल्या कोण आहे? तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने बुद्धिमान लोकांना कामावर ठेवले आणि बँका, राजकारणी आणि सरकारला आपल्या कामाने प्रभावीत केले. असे करण्यापासून तुम्हाला कोण रोखतं? व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवलेले नाही,’ असेही ते म्हणाले. आदिवासींनी आरक्षणाचा फायदा घेत शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आदिवासी समाजातील एक हजाराहून अधिक उद्योगपती उपस्थित होते.