विजयसिंह मोहिते पाटलांनी फोन स्विच ऑफ करून निर्णय घेतला – अजित पवार

0
746

पुणे, दि. २१ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती.  याबाबत  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी  त्यांच्याशी  संपर्क  केला होता.  मात्र, त्यांनी फोन स्विच ऑफ  करून आपला निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  येथे बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.

माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेताना  विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र, विजयसिंहानी वेगळ्या नावाचा आग्रह धरला.  परंतु त्या नावाला  माळशिरस वगळता इतर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा विरोध होता.  मोहिते-पाटील ज्येष्ठ  असल्याने त्यांची लोकसभेत गरज होती. मात्र, फोन स्विच ऑफ ठेवत त्यांनी आपला निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले.

भाजपकडून दबाव आणि प्रलोभनाचे राजकारण सुरू आहे. अडकलेले हात सोडविणे, चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावण्याची भीती दाखविणे, हद्दपारीच्या नोटीसा पाठविणे, असे प्रकार भाजपने सुरू केले आहेत.  त्यांच्याकडून  घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय स्वार्थासाठी  सुरू आहे. हा लोकशाहीवर घाला  आहे. मागील दाराने आणीबाणी आणली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला.