विघ्नहर्त्या गणरायाचे वाजतगाजत आगमन ! मुंबई, पुण्यासह अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब

0
719

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होतील. पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र सुरू होती. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

सुख, शांती,समृध्दी आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आज गुरूवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थी आगमन होत आहे. श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून दुपारी १.३० ही सर्वोत्तम वेळ आहे. शिवाय १२.३० ते ३.३० ही अमृत वेळ आहे. पार्थिव गणेशपूजनाचे हे व्रत भाद्रपद चतुर्थीला करायचे असते. त्यामुळे सूर्योदयापासून मंगलमूर्तीची (साडेसहा) प्रतिष्ठापना करता येईल. दुपारी दीडपूर्वी माध्यान्ह आरती व नैवेद्य दाखवणे अपेक्षित असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापनेचा विधी पूर्ण होणे आवश्यक असले तरी दिवसवर चतुर्थी असल्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पूजा करता येऊ शकते.