विकास दुबे एन्काऊंटरबद्दल प्रदीप शर्मा म्हणतात…

0
300

कानपूर, दि. १० (पीसीबी) : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती होती, ते माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी कानपूर एन्काऊंटरची पाठराखण केली आहे.

प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचं समर्थन केलं आहे. “मला वाटतं हा खराखुरा एन्काऊंटर आहे. 8 पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? आता पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर लगेच हे कार्यकर्ते समोर येत आहेत”, असं प्रदीप शर्मा म्हणाले. पोलिसांनी चांगलं काम केलं की लगेचच काही लोक प्रश्न उपस्थित करतात, असं शर्मा यांनी नमूद केलं.

प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. गेल्या अनेक वर्षापासून ते मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर ते काम करत होते. पोलीस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. जवळपास 35 वर्षांच्या पोलीस सेवेनंतर त्यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल शेकडो गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नोंद त्यांच्या नावे आहे.