विकास दुबेच्या एन्काऊंटरचं कोणीही राजकारण करु नये – संजय राऊत

0
240

मुंबई,दि.१०(पीसीबी) – विकास दुबेच्या एन्काऊंटरचं कोणीही राजकारण करु नये. एन्काऊंटरवर शंका उपस्थित करणं म्हणजे पोलिसांचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. खाकी वर्दीची भीती राहिली पाहिले. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असं म्हटलं. “हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असं झालं तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये,” असं आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केलं.

“अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचं कधी समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्म्यान, विकास दुबेला एक पक्ष विधानसभेचं तिकीट देणार होतं.. पण तो सरेंडर झाला नाही म्हणून मिळालं नाही असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला. चकमकीवर बोलताना संजय राऊत यांनी, “त्या राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती आहे,” असं सांगितलं.