विकासावर बोला म्हटल्यानंतर वाक्‌पंडित श्रीरंग बारणे बिळात लपले; लक्ष्मण जगताप यांचा प्रहार

0
1524

पिंपरी, दि. २६ – मला मौनी आमदार म्हणणारे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विधानसभेचा सभावृत्तांत पहावा. मी ज्या ज्या वेळी विधानसभेत शहरातील प्रश्न उपस्थित केले, त्या प्रत्येकवेळी शहरवासीयांच्या पदरात काही ना काही पडले आहे. वाक्‌पंडित असलेल्या बारणे यांचे लोकसभेत बोलून बोलून दात वाकडे झाले, तरी मावळ मतदारसंघातील जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. मी किंवा माझ्या कुटुंबियांनी एकाचीही जागा ढापली असेल, तर ते पुराव्यासह जनतेसमोर आणावे. अन्यथा तुम्ही व तुमच्या बगलबच्च्यांनी प्राधिकरणाच्या ढापलेल्या जागा परत करावेत. मी शहर बकाल केले असेल, तर नेमके काय केले हेही जनतेला सांगावे. तसेच अतिक्रमण कारवाईला कोठून सुरूवात करावी, हेही बारणे यांनीच सांगावे. त्यानुसारच कारवाई केली जाईल. विकासावर बोला असे मी आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद न देता बिळात जाऊन लपले आहेत, अशा शब्दांत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर प्रहार केले आहेत.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मी विधानसभेत शहरातील अनेक प्रश्न कित्येकदा उपस्थित केले आहेत. तरीही खासदार श्रीरंग बारणे यांना मी विधानसभेत काहीच बोलत नाही असे वाटत असेल, तर त्यांनी विधानसभेचा सभावृत्तांत पहावा आणि वाचावा. ज्या ज्या वेळी मी विधानसभेत शहराचे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्या प्रत्येकवेळी शहरवासीयांच्या पदरात काही ना काही पडले आहे. महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास हा मी विधानसभेत शहराचे प्रश्न मांडून ते सोडवल्याचा पुरावाच आहे. वाकपंडित म्हणून मिरवणारे खासदार बारणे यांचे लोकसभेत बोलून बोलून दात वाकडे झाले. तरी सुद्धा मावळ मतदारसंघातील जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. सभागृहांमध्ये लोकांचे प्रश्न मांडून दिखाव्यासाठी बोंबलणे सोपे असते. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी धमक असावी लागते.

मी पिंपरी-चिंचवडला बकाल केले म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलणारे खासदार बारणे यांनी शहर बकाल केले म्हणजे नेमके काय केले, हे सांगावे. माझ्या फ्लेक्सवर कोणत्या गुंडांचे फोटो लावलेले असतात हेही त्यांनी सांगावे. माझ्या कुटुंबाचा बांधकाम व्यवसाय आहे. मी किंवा माझ्या कुटुंबियांनी कोणाचीही जमीन ढापली असेल, तर खासदार बारणे यांनी पुराव्यासह जनतेच्या समोर आणावे. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार करावी. अन्यथा बारणे व त्यांच्या बगलबच्च्यांनी प्राधिकरणाच्या ढापलेल्या जागा सोडाव्यात. तसेच याप्रकरणी कारवाईची स्वतःहून मागणी करावी. खासदार बारणे हे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती होण्यापूर्वी दहा बाय दहाच्या खोलीत राहात होते. नंतर बारणे यांनी थेरगावात आलिशान बंगला कसा बांधला आणि त्यांचा व्यवसाय काय? हे जनतेला त्यांनी सांगावे.

माझ्याकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन आहे. त्यामुळे मला कोणाचीही जागा ढापण्याची गरज पडली नाही. नुसते फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यातून वेळ मिळाला, तर खासदार बारणे यांनी संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारावा. त्यामुळे त्यांना शहरातील बकाल परिसर कोणता आणि तो कोणामुळे बकाल राहिला हे कळेल. जनताही ते जाणून घेईल. शहरात अतिक्रमणे झाली असे म्हणणाऱ्या खासदार बारणे यांनी अतिक्रमण कारवाईला कोठून सुरूवात करायची हे त्यांनीच सांगावे. त्यानुसार महापालिका कार्यवाही सुरू करेल. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे ऊठसूठ माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या खासदार बारणे यांना विकासावर बोलण्याचे मी आवाहन केले होते. त्याला कोणताही प्रतिसाद न देता आता ते बिळात जाऊन लपले आहेत, अशा शब्दांत त्यांनी खासदार बारणे यांच्यावर प्रहार केले आहेत.”