‘विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा ‘राष्ट्रीय मिशा’ जाहीर करा’

0
320

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला १७ तारखेपासून सुरूवात झाली आहे. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच अभिनंदन यांच्या मिशांची स्टाइल ही ‘राष्ट्रीय मिशा’ म्हणून घोषित करावी अशीही मागणी त्यांनी केली.

मागील सोमवारी (१७ जून २०१९) रोजी सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी चौधरी यांनी अभिनंदन यांना पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली. याबरोबरच अभिनंदन यांच्या मिश्यांची स्टाइल ही राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी काँग्रेसच्या वतीने केली.

चौधरी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणामध्ये भाजपावरही निशाणा साधला. ‘टू जी घोटाळा तसेच, कोळसा घोटाळ्यात भाजपाला काही सिद्ध करता आले का?, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुम्ही तुरुंगात टाकू शकलात का?, तुम्ही त्यांना चोर म्हणून सत्तेत आलात मग ते इथे लोकसभेत निवडूण येऊन कसे काय बसले आहेत?’, असे सवाल चौधरी यांनी भाजपाला विचारले. चौधरी यांचे भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.