वाहन कर्ज आणि आरोग्य विमाधारकांना अर्थमंत्र्यांकडून दिलासा, EMI भरण्याच्या कालावधीत वाढ

0
433

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नोकरदार वर्गाला याचा फटका बसणार आहे. या संकटामुळे आलेल्या आर्थिक टंचाईमुळे घरांचे आणि वाहनांचे हप्ते भरणे नागरिकांना जड जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून वाहन धारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २३ कोटी वाहन मालक आणि ४० कोटी नागरिकांना केंद्रीय अर्थमंत्रालयानं मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने २१ एप्रिल २०२०पर्यंत विम्याचा हप्ता भरण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. नव्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने विमा अधिनियम १९३८च्या कलम ६४VBमध्ये संशोधन केलं आहे. या कायद्यात विम्याच्या हप्ता भरल्याशिवाय विमा संरक्षण मिळणार नसल्याचं अधोरेखित करण्यात आले होते. त्यात आता सरकारनं बदल केलेला आहे. त्यामुळे वाहन मालक आणि आरोग्य विमा संरक्षण लाभार्थ्यांच्या पॉलिसीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कामधंदे ठप्प असल्यानं अनेकांना पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे गृह, वाहन किंवा अन्य हप्ते कसे फेडायचे याचीच चिंता सामान्यांना सतावते आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामण यांनी दिलासादायक घोषणा केल्या होत्या.