“वाहतूक कोंडीतील वाहनांमध्येच नागरिकांची स्मारकं उभी राहणार”

0
486

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ठाण्यातील वाहतूक कोंडी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर तोडगा निघण्याऐवजी समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ठाण्यात होणाऱ्या अभुतपूर्व वाहतूक कोडींवर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. या वाहतूक कोंडीचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रेटींनाही करावा लागतो. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यालादेखील वाहतूक कोडींचा फटका बसला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. चिन्मय मांडलेकरने फेसबुक पोस्ट टाकत आपले म्हणणे मांडले आहे.

चिन्मयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, विले पार्लेपासून ते ठाणे पोहोचण्यासाठी त्याला चार तास लागले. यावेळी त्याने मेट्रोची कामे, खड्डे, अवजड वाहने, नियम न पाळणारे टोलनाके असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. चिन्मयने बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांवरही टीका केली असून ते शुभेच्छा देण्यात गुंतले असल्याचे म्हटले आहे. बहुतेक आमच्या रखडलेल्या वाहनांमध्येच एकदिवशी आमची स्मारके उभी राहणार! असा संताप चिन्मयने व्यक्त केला आहे. यावेळी त्याने #savethanefromtrafficjams हा हॅशटॅग वापरला आहे.